वाढती गुन्हेगारी, दहशत आणि अराजकतेमुळे बीड राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आले आहे. विधानसभेत रोज बीड जिल्ह्यातील एका एका प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीच त्याचा भांडाफोड केल्याने बीड राज्यातील बिहार झालंय का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडची कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर आली होती. प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याची आणि त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीची घोषणा केली होती. बीड पोलीस अधीक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती केली. कोण आहेत कॉवत, ते जिल्ह्यात ठरतील का सिंघम? असा सवाल करण्यात येत आहे.
बारगळ यांची उचलबांगडी, कॉवत यांची नियुक्ती
बीड जिल्हा खंडणी पॅटर्न, पीक विमा घोटाळा पॅटर्न, गावगुंड पॅटर्न यामुळे राज्यातच नाही तर देशाच्या केंद्रस्थानी आला आहे. पवनचक्की येथील लोकांना झालेल्या वादानंतर संतोष देशमुख यांची आरोपींनी निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होते. आरोपींना पोलीसच अभय देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अजून काही मोठे मासे आणि प्रत्यक्ष घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत.
विरोधकांनी विधानसभा दणाणून सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सरकारची बाजू मांडली. त्यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याची आणि नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, 24 तासात या पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत.
कोण आहेत SP नवनीत कॉवत?
नवनीत कॉवत हे 2017 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कॉवत हे मूळचे राजस्थान येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आयआयटीमधून बीटेक पदवी घेतली आहे. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी कंपनीमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून नोकरी केली. त्याचवेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. 2017 मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील हे रेल्वेत अधिकारी होते.