बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तर मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात थेट उल्लेख केल्याने बीडच नाही तर राज्याचे राजकारण तापले आहे. पोलीसांच्या तपासावर सुरुवातीपासूनच कुटुंबिय आणि संघटनाचा आक्षेप आहे. आता शरद पवार सुद्धा बीड दौर्यावर येत आहे. 21 डिसेंबर रोजी, शनिवारी पवार हे मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
दिल्लीसह नागपूरमध्ये मुद्दा तापला
सध्या दिल्लीसह राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत या खून प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. तर इकडे नागपूरमध्ये संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला. बीड जिल्ह्यातील बडे नेते आरोपींना वाचवण्याचा आणि पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. वाल्मिक कराड हा मुंडे यांचा सहकारी असल्याचा उल्लेख क्षीरसागर यांनी केला.
वाल्मिक कराड यांना करा अटक
वाल्मिक कराड यांच्यामुळे बीड जिल्ह्यात दहशत, अशांतता असल्याचा दावा क्षीरसागर यांनी सभागृहात केला. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे लोकांच्या मनात भीती आणि चीड असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणातील सर्वच आरोपींना आणि कराड यांना अटक केल्यास बीडमधील वातावरण शांत होईल असे ते म्हणाले.
असा आहे पवारांचा दौरा
शरद पवार हे 21 तारखेला सकाळी मसजोग गावाला येणार आहेत. 20 तारखेला ते छत्रपती संभाजीनगर ला मुक्काम करणार आहेत. ते देशमुख कुटुंबाची भेट घेत सांत्वन करणार आहेत या खून प्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत आहेत याचा शरद पवार आढावा घेणार आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात बऱ्याच घटना घडल्या आहेत. खोलात जाऊन गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी यासाठी शरद पवार स्वतः तिथे जात आहेत.ही घटना खूप वाईट आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी शरद पवार बीडमधे येत आहेतय बीडमध्ये आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत, यात राजकीय हेतू अजिबात नाही, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख खून प्रकरणी 7 आरोपी दाखवले आहेत, त्यातले 2 आरोपी पहिल्या दिवशी अटक केला होता मात्र त्याच्याकडून काय काय सामान जप्त केलं ते पोलिसांनी सांगितलं नाही. अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला आज अटक झाल्याचं समजत आहे. आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, आणखी 3 आरोपी फरार आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे. CBI मार्फत चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. पंकज कुमावत सारख्या अधिकाऱ्याकडे तपास दिला पाहिजे ही माझी मागणी आहे. माझं मुख्यमंत्री यांच्याशी काही बोल झालं नाही, असे सोनवणे म्हणाले.