बीड जिल्ह्यातील भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी झंझावाती भाषण केले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये एकच चैतन्य आणले. त्यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. त्यांनी शेरो-शायरीतून वातावरण निर्मिती केली. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा काढणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी पिवळे शर्टवाले महादेव जानकर आणि गोंडस लेकरू लक्ष्मण हाके असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या शब्दफेकीला उपस्थितीत सभेतूनही तितकाच जोरदार प्रतिसाद मिळाला.
मला माझी जनता प्रिय
हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच आहे. फार गोड आहे. माझा मुलगा आर्यमन. तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितलं तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे, असं पंकजा मुंडे या म्हणाल्या. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. १२ कोटी या जनतेने भरले. माझा निकाल लागला. जीव दिला लेकरांनी. तुम्ही माझ्यावर जीव लावता की नाही, मुलीसारखं प्रेम करता की नाही. आता मला काही नाही पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
तर मी शेतात मेळावा घेईल
मला मुंडे साहेबांनीव वारसा दिला. त्यांना त्यांचा मृत्यू दिसत आहे असं वाटतं. गोपीनाथ मुंडे शेवटचं वाक्य या गडावरून बोलले, मला गडावरून दिल्ली मुंबई नाही, पंकजा मुंडे दिसत आहे त्यांनी जो संदेश दिला तो मी खरा केला. मला काही करता आलं नसेल. पण मी भगवान भक्तीगड निर्माण केला. ज्या मातीत भगवान बाबांचा जन्म झाला, तिथे मी आले. लोक म्हणाले, ताई इथे घ्या मेळावा. मला काही लोक फोन करत होते, तुमच्या मेळाव्याला अमूक तमूक लोक येत आहे. म्हणाले, तुम्हाला इथून काढतील. मी म्हटलं आम्हाला काय, भगवान बाबांचा झेंडा घेऊन मी शेतात उभी राहिल, असे त्या म्हणाल्या.
तुमच्याकडं किती पिवळे शर्ट?
माझे बंधू महादेव जानकर. पिवळे शर्टवाले. किती पिवळे शर्ट आहे तुमच्याकडे? गोंडस लेकरू लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही. काल त्यांनी व्हिडीओ पाठवला. दसरा मेळाव्याला येतो म्हणाला. माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. पण माझा सन्मान ठेवून हाके आले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.