मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर खूनाचा गुन्हा आणि मोक्का देखील दाखल केला आहे. केज येथून वाल्मीक कराड यांना आज बीड न्यायालय़ात हजर करण्यात आले आहे. या दरम्यान, परळीचे व्यवहार गेली दोन दिवस कराड यांच्या समर्थकांनी बंद पाडले आहेत. कराड समर्थकांनी जाळून घेण्याचा देखील प्रयत्न काल झाला होता. या प्रकरणात आज वकीलांमध्येच फूट पडली. आणि दोन्ही पक्षाचे वकील या प्रकरणात तावातावाने मीडियासमोर आपली बाजू मांडू लागल्याचे विचित्र चित्र राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांना स्टंटबाज म्हणू लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातच पांगरी या गावात कराड समर्थ महिलांच्या तर अंगात आल्याचे चित्र पहायला मिळाले.
येथे पाहा पोस्ट –
मागच्या आजींना हसू येतंय….
इतका आक्रोश मोकोका 302 आरोपी जेल मधे गेल्यावर विचार करा ज्या मुलगी पत्नी आई मुलगा चा जिव गेला जिव घेतला …. pic.twitter.com/jlgyn8fn5K— कर्दन काळ (@Kardankal2519) January 15, 2025
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरणातून ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आठ आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला होता. आता थेट वाल्मीक कराड यांच्यावरच खूनाचा गुन्हा आणि मोक्का लावण्यात आल्याने कराड समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला. या निर्णयाच्या निषेध करण्यासाठी गेले दोन दिवस परळी बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी वाल्मीक कराड यांना दुपारी केज येथून बीड कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कराड यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाल्मीक कराड याच्या कोर्टात सुनावणी सुरु असताना कोर्टाच्या बाहेर वकीलांमध्ये चांगलीच जुंपली. २२ जानेवारीला पुन्हा कराडला कोर्टात आणले जाणार आहे. यावेळी कोर्टाच्या बाहेर महिला वकीलांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी घोषणाबाजी केली. या वेळी कराड समर्थक वकीलांनी आमचा आण्णा देव माणूस असल्याचे म्हटले. तसेच या महिला वकीलांचा निषेध करीत ही स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही, आम्हालाही संविधानाने बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
वाल्मीक कराड यांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने त्यांच्या पांगरी गावात महिलांनी अक्षरश: थैमान घातले. या महिला आमच्या आण्णाला न्याय द्या असे म्हणत रस्त्यावर पडून डोके बडवून घेत होत्या. त्यावेळी काही महिलांना तर अक्षरश: अंगात आले. या महिला चक्क घुमू लागल्या. आमच्या आण्णांना न्याय मिळाला पाहीजेत, तुमच्याकडे काही सबूत नसताना त्यांना गुंतवले जात असल्याचा आक्रोश या महिला करताना दिसल्या. या प्रकरणात अज्ञातांनी टायर जाळून रोडवरील वाहतूक देखील बंद करण्याचा प्रयत्न केला. बीड न्यायालयात दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांना भिडले तर पांगरी गावात महिलांना गाव डोक्यावर घेतल्याचे चित्र होते.