राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी वाल्मिक कराडविरोधात संताप व्यक्त केला. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. दरम्यान त्यांचा तरुणीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज बीड येथे मोर्चा निघाला. त्यापूर्वी हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावर आता आमदार क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
‘सध्या समोर येत असलेला फोटो निवडणुकीदरम्यान व्हायरल झाल होता. तो फोटो मॉर्फ केलेला आहे. मी कधीही इनशर्ट करत नाही. मी शर्ट बाहेर सोडलेले असते. या फोटोबाबत मी तक्रार केलेली आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी सदर फोटो पाठवण्यात आला. संतोष देशमुख प्रकरणात मी आवाज उचलू नये, म्हणून मला शांत करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. पण मी एक सांगतो मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’, अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांनी दिली.
तो फोटो सर्वात आधी बायकोला दाखवला
‘हा फोटो व्हायरल झाला. हा फोटो मी सर्वात आधी माझ्या पत्नीला दाखवला होता. पत्नीही तो फोटो पाहून हसली होती. राजकारणात काही जण कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात, हे त्या फोटोवरून दिसते. निवडणूक काळात तो फोटो व्हायरल झाला, तरीही लोकांनी मला विजयी केले. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. अशा मॉर्फ फोटोबाबत काहीतरी नियमावली असावी, अशी मागणी येत्या अधिवेशनात करणार आहे’, असे क्षीरसागर म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
आपण पहिल्यांदा वाल्मिक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मिक कराडचे नाव आहे. मग त्याला अटक का केली नाही, असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी केला. 19 दिवस झाले आहेत तरीही वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नसल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आक्रोश कमी होणार नाही, असे ते म्हणाले.