बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि नंतर खून करण्यात आला. यासह खंडणीप्रकरणात वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आला होता. त्याला केज न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता कोठडीत असताना वाल्मिक कराड याने मोठी मागणी केली आहे. त्याने न्यायालयाकडे या आजारात 24 तास मदतनीस मिळावा यासाठी दाद मागितली आहे. काय आहे त्याला आजार? काय आहे त्याची न्यायपालिककडे विनंती?
वाल्मिक कराड याला कोणता आजार?
वाल्मिक कराड याने न्यायालयात धाव घेतली आहे. स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचा दावा कराड याने केला आहे. ऑक्सिजन मशीन त्यासाठी दररोज लावण्याची गरज आहे. या आजारात ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावण्यात येते. ते चालवण्यासाठी एक मदतनीस 24 तास आवश्यक असल्याने, हा असिस्टंट आपल्याला देण्यात यावा अशी विनंती त्याने केली आहे. त्याने केज न्यायालयाकडे ही विनंती केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याविषयी सुचवल्याची माहिती समोर येत आहे.
वर्षाच्या अखेरच्या दिवशी शरण
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणात बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांच्या आमदारांच्या आवाजाला धार आली. ही क्रूर हत्या वाल्मिक कराड याच्या इशाऱ्यावरूनच करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवला. या प्रकरणी सुरुवातीला चालढकल करणाऱ्या पोलिसांवर मोठा दबाव आला. त्यानंतर वाल्मिक कराड 20 ते 22 दिवसांनी समोर आला. पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात तो दाखल झाला. त्याला अटक करून केज न्यायालयासमोर उशीरा रात्री दाखल करण्यात आले. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी हा घटनाक्रम झाला. त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
सुदर्शन घुले याचा पत्ता कळवा, बक्षीस मिळवा
संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या मागावर आहे. सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले याच्यावर आहे. सुदर्शन घुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. खूनाच्या घटनेपासून सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीआयडीने या तिघांना मोस्ट वॉटेंड म्हणून घोषीत केले आहे. त्यांचा ठावठिकाणा सांगणार्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.