बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या घटनेतील संशयित फरार आरोपी वाल्मिक कराड यांचा सीआयडी आणि पोलिसांकडून शोध सुरु आहे. पण वाल्मिक कराड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यानंतर आता सीआयडी चांगल्याच अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीआयडीने आज वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील सीयआडीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सीआयडीने मंजिली कराड यांना चौकशीनंतर सोडून दिलं आहे. पण सध्या कराड यांचे अंगरक्षक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी सुरु आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस झाले आहेत. पण अद्यापही या प्रकरणातील 3 आरोपी हे फरार आहेत. पोलीस, सीआयडीचे पथक अपार परिश्रम घेत आहेत, पण तरीही आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत. सीआयडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे देखील बीड शहर पोलीस ठाण्यात आज आले होते. यावेळी वाल्मिक कराड यांच्या पत्नीची जवळपास 40 मिनिटे चौकशी झाली आहे. त्यानंतर राजेश्वर चव्हाण आणि कराड यांच्या दोन अंगरक्षकांची चौकशी घेणं सुरु आहे. राजेश्वर आणि अंगरक्षक हे वाल्मिक कराड यांच्या संपर्कात आहेत का, त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? याबाबतची माहिती सीआयडीकडून घेतली जात आहे.
बीडच्या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक दावे केले आहेत. बीडच्या सगळ्या प्रकरणांमध्ये आकाचा हात आहे. तो आका आता कुठे आहे, काय करतो याची सर्व माहिती आपण नव्या पोलीस अधीक्षकांना दिल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. बीडमध्ये महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचा मोठा घोटाळा झाल्याचा दावा धस यांनी केला. एकाच व्यक्तीच्या नावाने 9 अब्ज रुपयांपर्यंत व्यवहार झाले, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. तसेच एका पीआयला सर्व माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आपण याबाबत उद्या पूर्ण फाईल दाखवून पुराव्यासह खुलासा करणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.