या 27 जून रोजी रात्री साडेआठ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावात दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. प्रकरणात पोलीस आता ॲक्शन मोडवर आहेत. पोलिसांनी 35 जणांसह इतर 40 ते 50 व्यक्ती विरुद्ध 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मात्र यात आठ दिवसांपासून पायाचा उपचार घेणाऱ्या रवी आघाव या तरुणावर ही पोलिसांनी चक्क 307 कलमानुसार गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरच संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.
काय घडले होते
27 जून रोजी काही समाजकंटकांनी गावात अचानक दगडफेक सुरु केली. त्यात काही दुचाकी आणि इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले. दगडफेकीत अनेकांची डोकी फुटली. कुणाला जबरी मार बसला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ गावात तणाव होता. ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यातून वाद पेटविण्यासाठी हा प्रकार झाल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या प्रकारामागे छगन भुजबळ असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
तरुणाचे म्हणणे काय?
रवी आघाव असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, 22 जून रोजी दुपारी त्याच्या पायाची सोनोग्राफी काढण्यात आली. त्यानंतर पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो गेल्या सहा दिवसांपासून उपचार घेत आहे. मातोरी इथल्या दगडफेकीत आपला काहीही संबंध नाही. तरीही चकलांबा पोलिसांनी माझ्यावर 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला चालता येत नाही. डिस्चार्ज घेऊन घरी आल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात नाहक गोवल्याचा आरोप त्याने केला.
पोलिसांची नार्को टेस्ट करा
पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी नसताना देखील पोलिसांनी गुन्ह्यात नाव घेतल्याने संबंधित पोलिसांवर त्याने रोष व्यक्त केला. आपल्या घरातील आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. चकलांबा पोलिसांची नार्को टेस्ट करावी. आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करावी. पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घातले पाहिजे.मी न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. पोलिसांकडून जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्यात आले आहे. पोलिसांची नार्को टेस्ट करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी रवी आघाव या तरुणाने केली आहे.