बीड जिल्ह्यात लोकसभेला मोठा धक्का दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरद पवार राष्ट्रवादी गट पुढच्या तयारीला लागला आहे. परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना या मतदारसंघात मोठे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांना गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे यांचा जावई आव्हान देऊ शकतो. या ताज्या घडामोडींमुळे या मतदारसंघात विधानसभेला मोठी धुमश्चक्री दिसल्याशिवाय राहणार नाही. काय घडत आहेत घडामोडी?
राजाभाऊ थोरल्या पवारांच्या भेटीला
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड उद्या मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजेभाऊ फड हे परळीतील आहेत. तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत.
फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. अशातच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजेभाऊ फड यांचे आव्हान असणार आहे.
मात्र परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बबन गित्ते, सुदामती गुट्टे हे देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ताकदीने लढणार
राजेभाऊ फड हे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यावेळी परळी मतदारसंघातून हजार कार्यकर्ते सोबत असतील असे त्यांनी स्पष्ट केले. आता सध्या पक्ष प्रवेश होत आहे. जर शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर परळी मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार परळी मतदारसंघासाठी स्वतः मैदानात उतरल्याने येथे विधानसभेसाठी चुरस दिसून येणार आहे.