बीडः आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी काल अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. देशात आणि राज्यात प्रभावी समजल्या जाणाऱ्या पक्षांना खरा आरसा दाखवण्याचे काम या निकालांनी केले आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे तर स्थानिक पातळीवर काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. बीडमध्ये याचे बोलके उदाहरण समोर आले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बीडमधील शिरूर तालुक्यात काँग्रेसच्या उमेदवाराला चक्क भोपळा घेऊन घरी परतावे लागले.
एकेकाळी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराला चक्क शून्य मत मिळाली आहेत. काँग्रेसच्या एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत मत मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. वयाचे 72 री गाठलेले फकीर शब्बीर बाबू… त्यांच्यासोबत जे घडलं ते राज्यात आज पावेतो कोण्याही राजकीय पुढाऱ्यांसोबत घडले नसावे. शिरूर कासार नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पार्टीकडून फकीर शब्बीर बाबू हे उमेदवार होते. वार्ड क्रमांक 6 मधून भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने होते. काल या निवडणूकीचा निकाल लागला आणि फकीर यांना धक्काच बसला. फकीर शब्बीर बाबू यांना शून्य मत मिळाली आहेत. या निवडणुकीत एकूण 198 जणांनी मतदान केलं असून भाजपच्या गणेश भांडेकर यांना 155 मतं मिळाली. भांडेकर यांचा विजय झाला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार शांतीलाल चोरडिया यांना 43 मतं मिळाली.
पदव्युत्तर शिक्षण झालेल्या फकीर शब्बीर बाबू यांचं मूळ पिंड हे काँग्रेस आहे. 1970 पासून ते काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेसच्या तत्कालीन खासदार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचे ते खंदे समर्थक राहिले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी पूर्णपणे पाठ फिरविल्यानं फकीर शब्बीर हे काही काळ नाराज झाले. परंतु मतदार राजाचा कौल देखील त्यांनी मान्य केला. लोकशाही मध्ये सत्याला न्याय नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविलीय. ज्या वॉर्डातून फकीर शब्बीर बाबूं उभे राहिले. त्या वार्डात त्यांचं मतदान नव्हतं. मात्र काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाच्या उमेदवाराला चक्क शून्य मतदान होते, हे राज्यातील पहिलीच घटना असावी…
इतर बातम्या-