मोठी बातमी! तीन महिने झाले लाडक्या भावा, बहिणींना पगारच नाही, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी मानधनापासून वंचित

| Updated on: Dec 12, 2024 | 2:57 PM

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अस्थापनांमध्ये लागलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तीन महीने उलटूनही मानधन मिळालेलं नाहीये, त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी! तीन महिने झाले लाडक्या भावा, बहिणींना पगारच नाही, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी मानधनापासून वंचित
Follow us on

भंडारा, रुपेश सपाटे, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारनं अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा देखील समावेश होता. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हाव आणि तरुणांना या निमित्तानं रोजगार मिळावा यासाठी सहा महिन्यांचा हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. या योजनेंतर्गंत ज्या बेरोजगार तरुण, तरुणींनी अर्ज केला त्यांना त्यांच्याच भागामध्ये रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गंत अनेक जणांना प्रशासकी विभागात देखील सहा महिन्यांसाठी रोजगारची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र आता या योजनेला तीन महिने उलटून गेले तरी या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अस्थापनांमध्ये लागलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तीन महीने उलटूनही मानधन मिळालेलं नाहीये, त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांनी आता भंडाऱ्यात आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी व रोजगार उद्योजकता कार्यालयाला निवेदन देत घेराव घातला आहे.

लाभार्थी आक्रमक 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थ्यांची भरती जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सहा महिन्यांकरिता करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक युवा तरुण बेरोजगारांना या योजनेअंतर्गत रोजगार मिळाला. मात्र दोन ते तीन महिने लोटूनही अनेकांना त्यांचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे या तरुणांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ही योजना फक्त निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांच्या तोंडाला पान पुसण्याकरिता आणली होती का? असा संतप्त सवाल या योजनेतील लाभार्थ्यांनी केला आहे. आक्रोश व्यक्त करत प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात निवेदन सादर करत जिल्हा समन्वय अधिकारी सुहास बोंद्रे यांना घेरलं, नियमित मानधन मिळावं, मुदत वाढवून द्यावी तसेच आम्हाला नियमित करण्याची मागणी या योजनेतील लाभार्थ्यांकडून करण्यात आली आहे.