भंडारा : मित्रासोबत वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दहावीतील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे घडली आहे. श्रेयस युवराज जिभकाटे (वय 16) असे मृताचे नाव आहे. तो गावातील गांधी विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होता. परीक्षेच्या तयारीसाठी सुट्या असल्याने तो शुक्रवारी घरी अभ्यास करीत होता. तर आई-वडील शेतावर कामासाठी गेलेले होते. दुपारी तो आपल्या दोन मित्रांसह वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेला. सुरुवातीला श्रेयस आंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. हा प्रकार पाहून त्याचे दोन्ही मित्र धावले. पण श्रेयसला बाहेर काढण्यात यश आले नाही. दुपारी उन्ह पडते. त्यामुळं नदीत शांत होण्याचा मोह होतो. पण, हा मोह श्रेयसला महागात पडला. त्याच्या मित्रांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
याची माहिती पोलिसांना दिली असता गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. श्रेयस हा हुशार विद्यार्थी असल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दहावीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थी घरीच अभ्यास करत आहेत. पण, अभ्यास करून किती करणार. वाचन, लेखन केल्यामुळे थकवा येतो. हा थकवा घालवण्यासाठी श्रेयस आंघोळीला गेला.
आंघोळ करत असताना सोबत मित्र होते. वैनगंगा नदीत तो उतरला. पण, खोल पाण्याचा श्रेयसला अंदाज आला नाही. त्यामुळे खोल पाण्यात गटांगळ्या घालू लागला. मित्राच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी प्रयत्न केले. पण, तोपर्यंत श्रेयसच्या पोटात पाणी गेले होते. श्वास थांबला होता. त्यामुळे धडपड करूनही तो पाण्याच्या बाहेर जीवंत येऊ शकला नाही. शेवटी श्रेयसचा मृतदेहच बाहेर काढावा लागला. आई-वडील शेतावर गेले होते. त्यांना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. हुशार श्रेयस गेल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.