भंडारा : सध्या राज्यात ठिकठिकाणी राजभाज्या महोत्सव सुरू आहे. या रानभाज्यांमुळे आदिवासी सहसा आजारी पडत नव्हते. आता या रानभाज्या लुप्त होत असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. औषधाने तात्पुरता गुण येतो. रानभाज्या या खऱ्या अर्थाने आजारी पडू देत नाहीत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. त्यामुळे अशा प्रकारचे महोत्सव शासनाच्या वतीनं राबवले जातात. ऊसगाव येथील सुखदेव पटले यांनी ३१ रानभाज्या साकोली येथील महोत्सवात आणल्या होत्या. सुरुंद, अळू, वास्टे, मटारू, रानवांगा, मोहफूल, आंब्याच्या खुला, बारहिरडा, वरकली, रानलसूण, भूईआवळा, उंदीरकान, काळा बरम्या, पांढरा बरम्या, रानकोचई, पातूरभाजी, रानमेथी, खापरखुटी, पांढरा भंगारा, कुत्री, तरोटा, काटेकोरसा, फोफंड्रा, केवकांडा, बहावा, भूईनिंब, गुडवेल, शिलारी आदी रानभाज्या गोळा करून महोत्सवात आणल्या होत्या. कृषी सहाय्यक अमित ठवकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
शहर, खेड्यात रानभाजीचं महत्त्व पोहचलं पाहिजे, हा अशा रानभाजी महोत्सवाचा उद्देश आहे. मलेरिया ताप आल्यास भूईनिंबाचा अर्धा कप अर्क प्यावा. दोन दिवसांत ताप गायब. भूईनिंबाची एक चमच भुपटी रोज सकाळी खाल्यास बीपी, शूगर कमी होते. लकव्याचा अंश असल्यास फोफुंड्याचा अर्क प्यावा. लकव्याचा अंश कमी होतो. गुडवेलमध्ये बरेच गुणसत्व आहेत. निंबाच्या झाडावरील गुडवेल खाल्यास आरोग्य तंदुरुस्त राहते. असंही सुखदेव पटले म्हणाले.
बांबूचे छोटे रोप म्हणजे वास्ते. वास्ते हे पावसाळ्यातच मिळतात. वास्त्यांपासून भाजी तयार केली जाते. शिवाय वडेही तयार केले जातात. वास्त्याचे लोंणचे तयार केले जाते. वास्त्याचे विविध पदार्थ चिभेची चव सुधारतात. रानवांगा याला ग्रामीण भागात डोरली म्हणतात. वात होत असेल त्यांनी रानवांग्याची भाजी खावी. किंवा रानवांग्याचे अवयव कुटून अर्क काढावा तसेच शेक द्यावा. कौर हा आजार झाल्यास भूईआवळा उपयोगी आहे. कौर झाल्यास भूईआवळ्याचा अर्क सकाळ सायंकाळ प्यावा.
बारहिरड्याला आयुर्वेदिक महत्त्व आहे. रोजच्या आहारात घेतल्यास खोकला होत नाही, असंही सुखदेव पटले यांनी सांगितलं. वरकली ही नैसर्गिक वनस्पती आहे. मे ते जुलैपर्यंत फळे लागतात. भाजीत वापरली जातात. वात झाल्यास पांढरा बरम्या पानाचे वडे खायचे. पांढरा बरम्याच्या पानासोबत एरंडीचे तेल लावून रात्री डोक्याला बांधल्यास डोकेदुखी कमी होते.
खापरखुटी ही शुगर, बीपीच्या रुग्णांनी खावी. काटेकोरसामध्ये जीवनसत्व असतात. विशेषता केस झडत असतील तर काटेसोरशाची पेस्ट तयार करून डोक्याला लावायचं.
मोहफुलापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. मोहसास, मोहाची खीर, मोहबर्फी, भाजले मोह, बोंड, मोह मिशळ, इडली आदी पदार्थ मोहापासून तयार केले जातात, असं महालगाव येथील महिलेनं तयार केलेले पदार्थ या रानभाज्या महोत्सवात विशेष आकर्षण होते. ऊसगावच्या रंजना येळे, आमगाव बुजचे मिलिंद कापगते यांनीही रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी कार्यालय साकोली आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले. साकोली उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, साकोली तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, आत्माचे रजनीगंधा ठेंभूकर, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.