भंडारा | 23 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘कलंक’ असा उल्लेख केला. हाच ‘कलंक’ शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र डागलंय. भाजपवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त नागपूरमध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. ज्या बॅनरची चर्चा होतेय. त्या बॅनरवर शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण अशा आशयाचे बॅनर नागपूरमध्ये लावण्यात आले होते. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आम्ही कोणावरही व्यक्तिगत टीका केली नाही . मात्र भाजप कलंक आहे. जर व्यक्तिगत टीका केली असेल तर ती करण्याच्या कोणाला अधिकार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून ‘कलंक’ हा शब्द चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवर, नागपुरात जाऊन टीका केली होती. ‘कलंक’ म्हणत फडणवीसांवर त्यांनी घणाघात केला होता. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले ‘कलंक’ आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
ज्या बॅनरचा उल्लेख होतोय. त्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोल-डिझेलचे भाव एक रुपयांनी कमी भावात मिळणार असल्याचं म्हटलं. तर मग आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रोज साजरा व्हावा आणि लोकांना स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळावं. रोज एक एक रुपयांनी ते स्वस्त व्हावं. 10-15 रुपयात लोकांना ते उपलब्ध व्हावं, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस कलंक नसून महाराष्ट्राचे भूषण आहेत, असं लिहिलेले बॅनर झळकले आहे. त्यावर नाना पटोले यांनी टीका केलीय.
महाराष्ट्रावर पूर परिस्थितीचे संकट असताना मुख्यमंत्री दिल्लीत जाणं भूषणावह नाही.एकनाथ शिंदे किती दिवस मुख्यमंत्री राहतील किंवा नाही राहतील. पण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. त्यावेळी हे सर्व लोक सत्तेच्या बाहेर जातील, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
चोराच्या मनात चांदणं तशी सध्या परिस्थिती आहे. मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती या दिवसात निर्माण झालेली आहे. त्यावर देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. मणिपूर आणि केंद्रातही भाजपचे सरकार असून आम्हाला डबल इंजिनचे सरकार द्या म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शब्द कुठे आहे? आश्वासनांचं पुढे काय झालं?, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.