भंडारा : राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अशात सगळ्याच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अशातच भंडाऱ्यात लागलेल्या पोस्टर्सची सर्वत्र चर्चा होतेय. वाढदिवसानिमित्त लावलेल्या पोस्टर्सवर काँग्रेस नेत्याचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उद्या (5 जूनला) वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसा अगोदर भंडाऱ्यात बॅनर झळकले आहेत. भावी मुख्यमंत्री असं यावर म्हणण्यात आलं आहे. शिवाय शेतकरी पुत्र असाही उल्लेख या बॅनरवर आहे.
भंडाऱ्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके आणि युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या या बॅनरवर नाना पटोले यांच्या नावासमोर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर्स नाना पटोले यांच्या गावापर्यंत लावण्यात आले आहेत.
या आधी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख करण्यात आला होता. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लागले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लावण्यात आले आहेत.
भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लागल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्याची कुठलीही गरज नाही. असे बॅन कुणी लावूही नयेत, अशी मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो, असं ते म्हणाले.
खरंतर माझा वाढदिवस हा सामाजिक स्तरावर राबवला गेला पाहिजे. अनेक शाळकरी, कॉलेजमध्ये जाणाऱ्या गरीब मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा असते. पण त्यांची आर्थिक परिस्थिती तशी नसते. त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी असतात. अशा गरजू लोकांना मदत करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो, असं नाना पटोले म्हणाले आहेत.