भंडारा : जिल्हा परिषदेत भाजपची आपसी गटबाजी शमविण्यासाठी भाजप प्रदेश महामंत्री व नागपूर विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळेची (Chandrasekhar Bavankule ) नियुक्ती निरीक्षकपदी करण्यात आली आहे. आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध असलेले बावनकुळे जिल्हा परिषदेची भाजपची गटबाजी कशी शमवितात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात नुकताच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपला परंपरागत मित्र काँग्रेससोबत (Congress) न जाता भाजपशी हातमिळवणी केली. अचानक झालेल्या या बदलामुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण चांगलेच वातावरण तापले आहे. 10 मे रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात राजकीय गणित बिघडू शकतात.
सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेस हे एकमेकांचे वैरी झाले आहेत. असे असताना भाजपासाठी सुवर्णसंधी आली आहे. मात्र एनवेळी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे व भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या गटातील चढाओढ निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत वाद पाहता भाजप पक्ष श्रेष्ठीने भाजप प्रदेश महामंत्री व नागपूर विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्रे दिली आहेत. त्यामुळे भाजपच्या दोन गटांतील वाद बघता बावनकुळे हे गटबाजीचे इंद्रधनुष्य कसे पेलतात हे बघने महत्वाचे ठरणार आहे.
भंडाऱ्यात पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला दिसून आला. जिल्ह्यातील 7 पैकी 4 पंचायत समितीवर राष्ट्रवादीने झेंडा रोवला. तर भाजपला एका सभापती पदावर तर, काँग्रेसला दोन सभापती पदावर समाधानी राहावे लागले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सभापती मोहाडी, लाखांदूर, पवनी व भंडारा पंचायत समितीवर निवडून आले. भंडारा पंचायत समितीत रत्नमाला चेटुले, लाखांदूरला संजना वरखडे, पवनीत नूतन कुरझेकर, तर मोहाडीत रितेश वासनिक यांच्या गळात सभापती पदाची माळ पडली. तुमसर भाजपाचे नंदू रहांगडाले तर साकोलीत काँग्रेस गणेश आले व लाखनीत प्रणाली सारवे पंचायत समितीपदी निवडून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलंय.