तेजस मोहतुरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : पीएफआयवर म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर लावलेली बंदी योग्य आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यात व्यक्त केलं. फडणवीस म्हणाले, नक्षलवादी त्यांच्याच समर्थकांना मदत करणार आहेत. नक्षलवाद्यांसारखं व्यवस्थेच्या विरुद्ध कट करणे, पीएफआयच्या माध्यमातून होत होतं. जे जे पीएफआयला मदत करतील. त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. राज्यातला गृह विभाग हा दसरा मेळावा, नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम याकडं लक्ष ठेऊन आहे. पीएफआय समर्थक संघटना विघ्न आणू शकतात, अशी शक्यता ध्यानात ठेवून तयारी करतो आहोत.
घाबरू नका. पण, दक्षता घ्यावी लागेल. गैरकारभार करणारे, लोकशाहीच्या विरोधातील तत्व अराजक पसरवू शकतात. त्यामुळं आयोजकांनी काळजी घ्यावी. गृहविभागही त्याची काळजी घेईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
भंडाऱ्यात धान खरेदीच्या काळात भ्रष्टाचार झाला. योग्य धान खरेदी संस्थांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली पाहिजे. धान खरेदीच्या अटी-शर्ती ठेवल्या पाहिजे. रिमोट सेंसिंगच्या माध्यमातून धानाचं क्षेत्र, कुठल्या तालुक्यात, कुठल्या गटात किती धान आहे, याचा अंदाज येतो. ते आपण सुरू करणार आहोत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
मधल्या काळात शेतकऱ्याचा धान घरीच राहिला. छत्तीसगड, मध्य प्रदेशातून धान आला. हे खपवून घेतलं जाणार नाही. आपल्याकडं किती होता आणि किती खरेदी झाली आहे, याचा अंदाज लावता येईल.
दोन वर्षे धानाच्या शेतकऱ्याला बोनस मिळाला नाही. ही मदत कुठल्या पद्धतीनं करायची. याचा अभ्यास एक उपसमिती करेल. त्यानंतर आम्ही घोषणा करू. खरेदीच्या आधारावर मदत देत होतो. त्यात बोगस खरेदी वाढल्या आहे.
संस्थेचे लोकं, व्यापारी बोनस लाटण्याचा प्रयत्न करतात. बोनसची पद्धत बदलून शेतकऱ्याच्या खात्यात मदत पोहचली पाहिजे, अशी प्रक्रिया करणार आहोत. शेतकऱ्यांना मदत करण्याचा मानस आहे, असं फडणवीस म्हणाले.
धान घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याठिकाणी फौजदारी कारवाई करू. 2014 ते 2019 चक्रिय बदली पद्धत आणली होती. मध्यंतरी सरकारनं ते सूत्र बंद केलं. नवीन सूत्र तयार करू. विदर्भातल्या रिक्त जागा भरण्याचे निर्देश मी दिले आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.