शिव्यांकडून ओव्यांकडे, ६०० शिव्या कागदावर उतरवल्या; होळीत स्वाहः केल्या

| Updated on: Mar 06, 2023 | 4:25 PM

संकलित झालेल्या शिव्यांचे कागद होलीकामातेस समर्पित करण्यात आले. सर्वांनी पुन्हा शिव्या देणार नाही. वाईट बोलणार नाही, अशा आशयाची शपथ घेतली.

शिव्यांकडून ओव्यांकडे, ६०० शिव्या कागदावर उतरवल्या; होळीत स्वाहः केल्या
Follow us on

भंडारा : भंडारा जिल्ह्यात आज एक अनोख्या होळीची चर्चा होत आहे. विद्यार्थ्यांनी चक्क 600 शिव्या कागदावर लिहून त्या कधीही न उच्चार करण्याचा संकल्प केली. या शिव्यांच्या कागदांना होळीत स्वाहः केले. हा आगळावेगळा संकल्प भंडारा शहरातील लाल बहादुर शास्त्री शाळेत राबवण्यात आला. शिव्यांकडून ओव्यांकडे या उपक्रमाद्वारे शाळेद्वारे हा कार्यक्रम करण्यात आला आहे. आपले वेगळेपण कायम जपणाऱ्या इतिहासकालीन लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मराठी भाषा समितीने होळीच्या सणानिमित्त एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धा शिव्यांकडून ओव्यांकडेची

समाजात जे बोललं जातं ते मुलांच्या बोलण्यात येतं. कधी-कधी घरीसुद्धा काही शिव्यांचा वापर केला जातो. त्यातूनही मुलांच्या बोलण्यात शिव्या येतात. मुलांच्या बोलण्यात कायम येणारे शब्द, अर्थही माहीत नसलेली शिवराळ भाषा, यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. समुपदेशनासाठी होळीच्या सणाचे माध्यम निवडले गेले आहे. चक्क शिव्यांकडून ओव्यांकडे या स्पर्धेचे आयोजन केले गेले.

सहाशेच्या जवळपास शिव्या

माहीत असलेल्या ऐकलेल्या, प्राणी, पक्षी, शरीरयष्टी, वर्ण, रंगरुप, आई, बहिणींना उद्देशून दिल्या जाणाऱ्या अश्लील शिव्या चक्क मुलांकडून संकलित केल्या गेल्या. लिखित स्वरुपातल्या या शिव्या सहाशेच्या जवळपास जमा झाल्या. संकलित झालेल्या शिव्यांचे कागद होलीकामातेस समर्पित करण्यात आले. यासह सर्वांनी पुन्हा शिव्या देणार नाही. वाईट बोलणार नाही, अशा आशयाची शपथ पण घेतली.

विधायक मार्गासाठी प्रयत्न

मुलांना सुसंस्कारित करुन शिक्षण प्रवाहात पुढे नेण्यासाठी योग्य दिशा ठरवणे गरजेचे असते. मुलांच्या शिवराळ भाषेवर विधायक मार्गानेच प्रयत्न करावेत, या उद्देशाने शिव्यांकडून ओव्यांकडे या उपक्रमाचे आयोजन केले, असे प्रतिपादन शाळा प्रशासनाच्या वतीनं शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी केले आहे.