भंडारा – भंडारा जिल्ह्यात तीनदा अतिवृष्टी झाली. यात जिल्ह्यातील धानपिक भुईसपाट झाले. धान पिकासह भाजीपाला पिकाचे पंचनामे झाले. महिना ओलांडला असतानासुद्धा पिकविम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे विम्याचा फायदा कधी मिळणार, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत. भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. मुख्य पिक धान पिक आहे. यंदा 1 लाख 87 हजार हेक्टरवर धान पिक लागवड केली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घेतला आहे. विशेष म्हणजे हा विमा केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून काढला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. यात जिल्ह्यातील शेतकऱ्याचे पिक सडले. धान पिक करपले गेले. सततच्या पावसाने पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला. यात हजारो हेक्टरवरील जमिनीच्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले.
आपण काढलेला पिक विमा या नुकसानीला तारक ठरणार असे वाटत होते. मात्र नुकसानीचे पंचनामे होऊन महिना लोटला. तरी विमा कंपनीद्वारे विम्याच्या रक्कमेची अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.
वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रात्र जागून रांगाच्या रांगा लावत पिक विम्या काढला. एक-एक कागद जमा करत पिक विम्या भरला.
मात्र, जेव्हा मोबदला देण्याची वेळ आली तर कंपनी पुढे यायला तयार नाही. त्यामुळे कंपनीचे पोट भरण्यासाठी आम्ही पिक विमा काढतो का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत.