भंडारा : मोहाडी शहरात चंडेश्वरी मंदिराजवळील (Chandeshwari Temple) मार्गावरील नाल्याला पूर आला. नाल्यालगतच्या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा रस्ता पार करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढल्याने कार पाण्यात तरंगु लागली. वेळीच दोन लोकं कारसह वाहून जाणार होते. तेवढ्यात लोकं मदतीला धाऊन येत वाहती कारला पकडून ठेवले. कारसह दोन लोकांचे प्राण वाचले. मोहाडीत पावसाच्या पाण्याचा कहर पहायला मिळत आहे. सततच्या मुसळधार पावसाने जनावरांचा चारा-तणस वाहून गेला. दुसरीकडे वाचलेला चारा सततच्या ओलाव्याने सडला. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यात मोहाडी शहरातील (Mohadi City) 70 पशुपालकांचा (Herdsmen) समावेश आहे. आता जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न मोहाडीतील पशुपालकांना पडला आहे. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
भंडारा-मध्यप्रदेश राज्यमार्ग मोहाडी शहराजवळ जलमय झाला. रस्त्यावरुन दीड ते दोन फुटावरुन पाणी वाहू लागल्याने मोहाडीजवळ भंडारा- मध्यप्रदेश मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे या मान्सून सत्रांत दुसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. मोहाडी येथील चंदुबाबा नाल्याचे पुराचे पाणी मोहाडी शहरातील बसस्थानक परिसरात साचले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून भंडारा-तुमसर वरील मार्गवरील वाहतूक तात्पुरता बंद झाला आहे.
भंडारा जिल्हात कालपासून हवामान खात्याच्या रेड अलर्ट मिळाला. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी -नाले ओसांडून वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून की काय जंगल-पहाडीतून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोंदेखारी-चांदपूर मार्गावर पुराच्या पाणी साचल्याने पाण्याने मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गोंदेखारी व चांदपूरचा आपसी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या मान्सून सत्रात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला आहे. रस्त्यावर तलावाचे साम्राज्य निर्माण झाले. सतत पाणी वाहू लागल्याने गावकऱ्यांनी तसेच गावातील मजूर व शेतकऱ्यांनी आपल्या कामाला न जाता गावातच राहणे पसंद केले आहे.
तुमसर शहरातील मातानगर येथील मुकेश मलेवार हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या घराचे बांधकाम हे माती-दगडांचे आहे. तुमसर येथे तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मलेवार यांच्या घराच्या भिंतीतही पावसाचे पाणी मुरल्याने माती सैल झाली. त्यातच दुपारी त्यांची पत्नी स्वयंपाक घरात असताना घराची भिंत कोसळली. माती पडायला सुरुवात होताच तिने घरातून पळ काढल्याने जीवितहानी टळली. मुकेश मलेवार यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्यांना घर बांधण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 11 ऑगस्ट रोजी शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांची सुटी रद्द करण्यात आली आहे. सर्वांना कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 11 व 12 ऑगस्ट रोजी खाजगी कोचिंगदेखील बंद ठेवण्यात यावे. शाळेची सुटी फक्त 11 ऑगस्ट रोजी राहील. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनानं कळविलं.