भंडारा : कोल्हापुरात पोटनिवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी पैसे वाटप करणार आहेत, असा आरोप चंद्रकांत दादा पाटील यांनी महाविकास आघाडीवर केला होता. याची तक्रार ईडीकडं करणार असल्याचं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, ) म्हणाले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलंय. ईडी काय भाजपची घरगडी आहे काय, असं पटोले म्हणाले. तसेच भाजपचे नेते धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केलं. त्याचाही पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी पेटीएमचा उपयोग करून मतदारांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारची प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावर बोलताना कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजप हरणार आहे. भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. महागाई वाढत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व बेरोजगारी हे प्रश्न आता समोर आले आहे. कोल्हापूरची निवडणूक भाजप हरणार आहेत. म्हणून भाजप आता रोंटी खात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.
बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. धर्माच्या नावाने लोकांना भ्रमित करण्याचे काम भाजप करीत आहे. काँग्रेस हा जातीवाद करतो. या चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. धर्माच्या नावाने लोकांना भ्रमित करायचे हे काम भाजप करीत आहे. हे आता भाजपनं थांबवलं पाहिजे. आधी पोटोबा नंतर विठोबा हे आपले संत बोलून गेले आहेत. संताला न मानणारी भाजपची मानसिकता आहे. हिंदू धर्माचा वापर सत्तेसाठी करायचा. कोरोना काळात हिंदूंना वाऱ्यावर सोडून द्यायचे. गंगा नदीत मृतदेह वाहून गेले, हे प्रकार आपण पाहिले आहेत, अशीही टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.
राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आलं. केंद्राच्या दबावाखाली तर ते वक्तव्य करीत नाहीत, असा संशय आता व्यक्त होत आहे, असंही नाना पटोले म्हणाले. सुरुवातीपासून काँग्रेसची भूमिका राज ठाकरे यांच्या बद्दल कुठल्याही मत व्यक्त करणारी नाही. पण, काल अडीच वर्षांनंतर राज ठाकरे लोकांनसमोर आलेत. काल अपेक्षा होती की बेरोजगार, महागाई व देशात सुरू असलेल्या कटकारस्थान या विषयांवर बोलतील. पण त्यांच्या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसबद्दल जास्त प्रेम दिसून आले. स्वतः राज ठाकरे यांना ईडीचे नोटीस आली होती. अडीच वर्षांनंतर ते लोकांसमोर आले. केंद्राच्या दबावाखाली तर ते वक्तव्य करीत नाही, असा संशय आता व्यक्त होत आहे. या प्रकारची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.