भंडारा : भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाने आपला राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत युती केली. त्यामुळे जिल्ह्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याचे परिणाम भविष्यात होणाऱ्या नगर परिषद, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांवर होणार काय? नवीन राजकीय समीकरण जूळून येतील काय? असा सवाल निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील 5 बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. तुमसर-मोहाडी वगळता जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सहकार क्षेत्रावर पकड मजबूत ठेवण्यासाठी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. येत्या 30 एप्रिलला जिल्ह्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार परिणय फुके जोमाने कामाला लागले आहेत.
काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषद असो की भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायत प्रमाणे भाजपाने आपला शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करीत काँग्रेसला धक्का दिला आहे.
या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याच होम ग्राउंडवर यांना मोठा धक्का असल्याचे समजण्यात येते. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.
भंडाऱ्यापाठोपाठ गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न पाहण्यास मिळाल्याने कोण नाय कोणाचा यावरून लक्षात येत आहे. भाजपने राष्ट्रवादीसोबत घरोबा करीत काँग्रेसलाच हात दाखविला. तेव्हा नाना पटोले चांगलेच संतापलेले आहेत. यावरून असे सिद्ध होते की नाना पटोले यांना त्यांच्या जिल्ह्यात एकटा पाळण्याच्या डाव त नाहीना.
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. तसेच कुणीच कुणाचा वैरी नसतो, हेदेखील बरेचदा सिद्ध झाले आहे. सत्तेच्या समीकरणासाठी राजकारणी वेळेवर कसलीही तडजोड करू शकतात. याचाच उदाहरण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून समोर आला आहे. नाना पटोले यांच्या अस्थित्वासाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे.