भंडारा : जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. लाखनी तालुक्यातील मुरमाडीत युवकाचा उष्माघाताने दुर्देवी मृत्यू झाला. आचल चिंतामण गजभिये (Achal Gajbhiye) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृतक आचल गजभिये यास रविवारी ताप आला होता. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital Lakhni) येथे नेण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर औषधोपचार केल्याने बरे वाटले. तो घरी गेला. पण काही वेळानंतर त्याला रात्री अचानक भयंकर ताप आला. नातेवाईकांनी पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा (District General Hospital Bhandara ) येथे नेण्याचा नातेवाईकांना सल्ला दिला.
आचलला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. आचल हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. विदर्भात उष्णतेची लाट आल्यामुळे पारा 46 अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भात उष्माघाताचा संख्येत ही वाढ होत आहे. विदर्भात आतापर्यंत उष्माघाताचे 17 बळी गेले आहेत. नागपुरात 11, अकोला जिल्ह्यात तीन, तर अमरावतीत एकाचा उष्माघाताने बळी गेला. चंद्रपूरमध्ये एक, तर आता भंडाऱ्यात पुन्हा एक उष्माघाताचा बळी गेलाय. अशाप्रकारे यंदा उष्माघाताच्या विदर्भातील मृतकांची संख्या 17 वर पोहचली आहे.
नागपुरात काल 43.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होते. पुढील दोन-तीन दिवसांत या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील कालचे तापमान 44.4 अंश डिग्री सेल्सिअस होते. जवळपास असंच तापमान पुढील दोन-तीन दिवस कायम राहणार आहे. चंद्रपुरात काल 44.6 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होते. असेच तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. वर्धा येथे काल 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होते. एकंदरित विदर्भात 43 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची रोज नोंद होत आहे. आकाश ढगाळलेले असले, तर तापमानात काही घट झालेली दिसून येत नाही. काही ठिकाणी वादळ-वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडतो. पण, तापमान मात्र कायम असल्यानं उष्माघाताचा धोका अधिकच आहे. त्यामुळं उन्हापासून बचावासाठी काळजी घ्यावी लागत आहे.