तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : तीन वर्षांची चिमुकली. खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली. बाहेर सोसाट्याचा वादळी वारा आला. यावेळी गावातील किराणा दुकानात खाऊ घेण्यासाठी जाणाऱ्या तीन वर्षीय बालिकेच्या अंगावर भिंत कोसळली. शेषराव मेघराज यांच्या घराची भिंत कोसळल्यानं बालिकेचा दबून मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात घडली. देविका प्रकाश दिघोरे (वय 3) असं मृतक बालिकेचं नावं आहे.
वेळ सायंकाळची. सोसाट्याचा वारा सुरू होता. तीन वर्षीय मुलगी खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. रस्त्यात भिंत कोसळल्याने बालिका त्याखाली दबली गेली. काल सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे घडली. सोनी येथील देविका तिघरे असे या मृत मुलीचं नाव आहे.
देविका सायंकाळी खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. वादळी वारा सुरू होता. रस्त्यात शेषराव मेघराज यांच्या घराची मागची भिंत देविकाच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीर जखमी झाले. जखमी देविकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवला. तहसीलदार वैभव पवार यांनी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. बालिकेच्या आईने टाहो फोडला होता. बालिकेच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. शासनाकडून शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
घटनेची माहिती होताच देविकाच्या आईने एकच टाहो फोडला. माझी चिमुकली मला परत द्या, असं ती रडत-रडत म्हणत होती.