नाशिकः एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर शरसंधान साधणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे (Nana Patole) आज महाविकास आघाडीतील ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (ChhaganBhujbal) यांनी नाशिकमध्ये आपल्या शैलीत कान टोचले. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, असे विधान करत त्याच्या जोडीला दोन-तीन राजकीय सभ्येतेची उदाहरणे दिली. त्यानंतर बस, मला काही बोलायचे नाही म्हणत हा विषय संपवूनही टाकला. नेमके काय म्हणाले भुजबळ जाणून घेऊयात.
बाळासाहेब, पवारांचे उदाहरण
बोलघेवडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या त्यांच्या वक्तव्यावरून नेहमी चर्चेत आहेत. इगतपुरीमध्येही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते, असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, असे म्हणून त्यांनी थोडेसे या व्यक्तींच्या बाबत म्हणत दोन राजकीय सभ्यतेची उदाहरणे दिली. ते पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असताना इंदिरा गांधी आणि शिवसेना यांच्यात वाद होता. मात्र, इंदिराजींचा अपमान करायचा नाही, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. कारण त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी दुसरे उदाहरण शरद पवारांचे दिले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमात ते आले. तेव्हा स्वतः शरद पवार उठून उभे राहिले. हा त्या खुर्चीचा मान आहे. बस्स, मला काही बोलायचं नाही, असे म्हणत त्यांनी पटोलेंना उपदेशाचे चार शब्द सांगत कान टोचले.
केंद्राने हस्तक्षेप करू नये
भुजबळ म्हणाले की, शिवसेनेच्या शाखा अनेक राज्यात आहेत. त्यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. काश्मीर, उत्तर प्रदेश मध्ये मी स्वतः सभा घेतल्या आहेत. त्यावेळी कश्मीरमध्ये अनेकांनी आपली आडनावे हिंदू करून घेतली. आता राहुल गांधींनी देखील सांगितले की आम्ही हिंदू आहोत. मात्र. त्यांचे हिंदुत्व वेगळे आहे. यांचे हिंदुत्व वेगळे आहेच. राज्यांवर आक्रमक करणे हे यांचे हिंदुत्व आहे. राज्यातल्या अधिकाऱ्यांना केंद्रात बोलावण्याच्या निर्णयाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. राज्याच्या अधिकारात केंद्रांनी हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यावरणाचा नाश नको
नाशिकमध्ये सध्या एका उड्डाणुपुलासाठी साडेचारशे झाडे तोडावी लागणार असल्यामुळे वाद सुरूय. यावर भुजबळ म्हणाले की, आपण पर्यावरणाचा नाश करतो आहोत. पर्यावरणाकडे लक्ष द्यायला विकासकांना वेळ नाही. अजून झाड तोडा म्हणजे विकास होईल. मुंबईसारखी परिस्थिती झालीच तर ब्रिज तयार करण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था आहेत. शहराचा विकास बैठा करा. गलिच्छ वातावरण, प्रदूषण ही परिस्थिती नाशिक होऊ नये. त्याकडे कारभाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!