नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवी सरस्वतीच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपच्या (BJP) युवा मोर्चाने बुधवारी छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी भुजबळ फार्म येथे निषेध आंदोलन (Peotest) केले होते. यावेळी सरस्वती देवीची प्रतिमा घेऊन जात पूजन करत छगन भुजबळांच्या व्यक्तव्याचा निषेध केला होता. यानंतर आता भाजपच्या महिला देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी देखील छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म (bhujbal Farm) येथे धडक देत प्रवेशद्वारावर सरस्वतीची प्रतिमा घेऊन जात पूजन केले आहे. यावेळी भाजप महिला राज्य अध्यक्ष असलेल्या उमा खापरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे.
भाजप नेत्या उमा खापरे यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करत भुजबळांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
या निषेध आंदोलनाच्या दरम्यान उमा खापरे यांनी भुजबळांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली जाईल असा इशारा दिला आहे.
भुजबळ यांनी शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावला पाहिजे.
पण, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला सरस्वतीला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलंच नाही.
असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आहे आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची ? असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी हे विधान केले होते.
यावरूनच आता छगन भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात असून विद्येच्या देवतेचा अपमान केला आहे आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडू अशी भूमिका खापरे यांनी घेतली आहे.