राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. भुजबळ यांनी उघडपणे त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. आजही त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचं उघड केलं आहे. तसेच त्यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेची ऑफर होती, याचा गौप्यस्फोटही केला आहे. मात्र, आपण राज्यसभेवर जाण्यास इच्छूक नाही, पक्ष नेतृत्वाला तसं स्पष्ट केल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भुजबळ हे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. सात आठ दिवसांपूर्वी आमची बैठक झाली होती. यावेळी मला राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव दिला होता. कारण राज्यसभेवर जाण्याची मी पूर्वी इच्छा व्यक्त केली होती. पण मला तेव्हा पाठवलं नव्हतं. त्यानंतर मला विधानसभेतून लढायला सांगितलं. तुमच्याशिवाय येवला नाही. तुम्ही येवल्यातून लढा. तुमच्यामुळे पक्ष वाढेल, असं मला सांगण्यात आलं होतं. मी तेव्हा म्हटलं मी लढतो आणि मी येवल्यातून विधानसभा निडवणूक लढलो. लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो, असं छगन भुजबळ म्हणाले.
एक दोन वर्षाने विचार करू
आधी मला येवल्यातून लढायला सांगितलं. आता मला विधानसभेचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिली. मी त्यांना सांगितलं मी राजीनामा देऊन ताबडतोब जाऊ शकत नाही. कारण मतदारांवरचा तो अविश्वास ठरेल. मला आता राज्यसभेवर जायचं असेल तर मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. माझे मतदार निराश होतील. त्यामुळे मी त्यांच्यासोबत असं वागणार नाही हे मी वरिष्ठांना कळवलं आहे. तसेच त्यांची राज्यसभेची ऑफर नाकारली आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. मी विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. मी राज्यसभेवर आता जाणार नाही. एकदोन वर्षानंतर राज्यसभेचा विचार करू. आता जाणार नाही, असंही ते म्हणाले.
त्याचा फायदा झाला
तुम्ही विधानसभेचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाणार का? असा पुन्हा एकदा सवाल केला असता भुजबळ यांनी उफ्फ… उफ्फ… असं विधान करत राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारत नसल्याचं स्पष्ट केलं. मी ओबीसींचं आंदोलन उभं केलं नाही. माझ्या ओबीसींच्या संरक्षणासाठी मैदानात आलो. ओबीसींसाठी मी राजीनामा दिला. मी लढणार आहे. जे चुकीचं आहे, त्यावर बोलणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, राजीनाम्यावर बोलू नका. मी म्हटलं ठिक आहे. दोन्ही बाजूचे लोक अंगावर येत असताना मी ठणकावून कायदेशीर बाजू मांडली. मी पूर्णपणे त्या लढ्यात उतरलो. ओबीसी आणि लाडकी बहिणीचा महायुतीला फायदा झाला. लोकही म्हणतात, असंही त्यांनी सांगितलं.