स्वप्नील उमप, टीव्ही 9 मराठी, अमरावती : किराणा वाटपावरून अमरावतीत बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी गरिबांना किराणा वाटप केले होते, गरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता राणा कुटुंब हे दरवर्षी किराणा वाटप करत असतात. यावरून बच्चू कडू यांनी राणा कुटुंबावर टीका केली होती. यामध्ये एकीकडे खिसे कापायचे आणि दुसरीकडे किराणा वाटायचा असा टोला लगावत बच्चू कडू यांनी टीका केली होती. यावरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आमदार होण्याआधीपासून मी किराणा वाटप करत आहेत, शेतकऱ्यांची शेतमजुरांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी मी प्रयत्न करत असतो. पण बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. बोलण्यात प्रामाणिकपणा नसून मी त्याच्या सारखा गुवाहाटीला जाणारा आमदार नाहीये, बच्चू कडू आंदोलन फक्त तोडी साठी करतो, तोडीबाज म्हणून बच्चू कडूची ओळख आहे असा एकेरी उल्लेख करत रवी राणा यांनी बच्चू कडू यांचा समाचार घेतला आहे.
माझ्यामध्ये हिंमत आहे, गोरगरीबासाठी मदत करते, लग्न, अंत्ययात्रासाठी मदत करतात, गुवाहाटीला जाणारा मी नाहीये. असं रवी राणा म्हणाले.
याशिवाय आमदारकी आली की दमडी पाहिजे, राज्यसभा आली की दमडी पाहिजे, सरकार आणायचे गुवाहाटीला जायचे की दमडी पाहिजे ज्या माणसाचे जीवन म्हणजे पैसा आहे.
मी किराणा वाटतो, बच्चू कडू यांनी एक किलो साखर वाटून दाखवावे, नौटंकीबाज आहे, अमरावतीच्या लोकांना सर्व माहिती झाले आहे.
लोकांसाठी आंदोलन करतो, त्यात तोडी करून आंदोलन मागे घेतो तसा मी नाही, मी किराणा वाटतो त्याने एक किलो साखर तरी देऊन दाखवावी असे आवाहन रवी राणा यांनी केलं आहे.