विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी पुण्यातील काही माजी नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा का दिला याचं कारण अजून समोर आलेलं नाही, मात्र आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला गळती?
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं चांगलं यश मिळवलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या, 131 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना देखील चांगलं यश मिळालं. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील तीन घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या तिघांना मिळून पन्नास जागाच जिंकता आल्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी भाजपमध्ये आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी जरी राजीनामा दिला असला तरी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.