ईगतपुरी, नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे शहर असणाऱ्या इगतपुरी शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक टाहो फोडत आहेत. इगतपुरी नगरपरिषदेचा अनेक वर्षांपासूनचा एकतर्फी ढिसाळ कारभार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि गेंड्याच्या कातडीच्या धोरणामुळे इगतपुरीकर नागरिक तृषार्त आहेत. आठवड्यात फक्त तीन दिवस पाणीपुरवठा होत असून संतापजनक बाब म्हणजे फक्त दहा मिनिटे हे पाणी येत असल्याने नागरिक नगरपालिका प्रशासन आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाताळण्यात अनेक वर्षापासून सत्ता भोगणाऱ्या लोकांना सपशेल अपयश आल्याचे बोललं जात आहे. इगतपुरीकर नागरिकांचा अंत पाहिला जात आहे का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे. शहराच्या अनेक भागात पाण्याच्या टंचाईचा सामना महिलांना करावा लागत आहे. यामुळे नागरिक वैतागले असून पदाधिकाऱ्यांना शिव्याशाप दिले जात आहेत.
धरणांचा तालुका म्हणून इगतपुरीची ओळख आहे. सर्वाधिक पाऊसही इगतपुरी शहरात होत असतांना शहराला पाणीपुरवठा का होत नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आठवड्यातून तीन वेळा पाणीपुरवठा आणि तोही केवळ दहा मिनिटे होत असल्याचा आरोप नागरिक करत असून अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.
पाणी प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थ संतप्त आहे, त्यामुळे गावात लोकप्रतिनिधी फिरकत नाही, अधिकारीही भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.
राज्यातील सर्वाधिक पाऊस पडण्याच्या ठिकाणांपैकी इगतपुरी हे एक शहर आहे. इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो तरी देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांना लोकप्रतिनिधी मात्र केवळ आश्वासने देऊनच वेळ मारून नेत असल्याने नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.