राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आणि आता मंत्र्यांना खाते वाटप देखील करण्यात आलं आहे. दरम्यान खाते वाटपानंतर सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत महिलांना पाच हाप्ते देण्यात आले आहेत, आता डिसेंबरचा हाप्ता देखील लवकरच मिळणार आहे.
दरम्यान आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2 हजार 100 रुपये जमा करू असं आश्वासन त्यावेळी महायुतीकडून देण्यात आलं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे 2 हजार 100 रुपये खात्यामध्ये कधीपासून जमा होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यासाठी थोडी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात बोलताना त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याबाबत माहिती दिली.
नवं सरकार सत्तेत येताच केंद्राकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एकाच वर्षात तब्बल वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे, याचा लाभ हा जे जे बेघर आहेत, त्या सर्वांना मिळेल. विषेत: लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबतच हक्काचं स्वत:च घर देखील मिळणार आहे.