मुंबई । 24 जुलै 2023 : एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड, मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय आणि शिवसेनेत झालेली पडझड याचा समाचार उद्या उद्धव ठाकरे सामनामधून घेणार आहेत. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरे गटात मोठी उलथापालथ झाली आहे. आमदार मनीषा कायंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे या महिला नेत्यापाठोपाठ आता महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार यामिनी जाधव, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, आशा मामेडी या महिला नेत्यांनी याआधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या आणि सात वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून शिवसेना पक्ष वाढिसाठी प्रयत्न करू असेही तृष्णा विश्वासराव म्हणाल्या. आमदार सदा सरवणकर, आमदार आणि शिवसेना सचिव मनीषा कायंदे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक परमेश्वर कदम, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेमध्ये सात वेळा नगरसेविका म्हणून सातत्याने निवडून येणारे तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे मनापासून स्वागत. सातत्याने नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या. सभागृहनेत्या, विभाग प्रमुख, संपर्कप्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
मुंबई शहरांमध्ये काही मोजक्या लोकांचे नाव सगळेजण अभिमानाने घेतात त्यामध्ये तृष्णा ताई यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांनी आज बाळासाहेब यांच्या आणि खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचे अभिनंदन करतो. वर्षाभरापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला त्यामध्ये लोकांचे हित होते. जे निर्णय घेतले ते हिताचे होते आमच्या निर्णयाला लाखो लोकांनी पाठिंबा दिला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जी धाडसी भूमिका घेतली त्याला हजारो, लाखो लोकांनी समर्थन दिलं. दररोज शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रत्येक जिल्हा, तालुक्यातले लोक दररोज प्रवेश करत आहेत. सरकार कोणासाठी असते? सरकार सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असते. त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी सरकार असले पाहिजे. कायदे, नियम बदलणारे सरकार असले पाहिजे. ते काम आम्ही करतोय म्हणून अल्पकाळात हे सरकार लोकांचे सरकार झाले असे सांगतानाच तृष्णा विश्वासराव यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.