मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. पुन्हा मास्क लावा अशी सूचना सर्व राज्यांना कालच केली होती. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात एका दिवसात 1 हजार 805 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात नव्या 205 रुग्णांची भर पडली आहे. राज्यसरकारप्रमाणेच मुंबई महापालिकेनेही वाढत्या कोरोना रुग्णांची गंभीरतेने दाखल घेत पालिका रुग्णालये सज्ज ठेवली आहेत.
रविवारी महाराष्ट्रात 397 एवढी कोरोना रुग्ण संख्या होती. सोमवारी ही संख्या 205 एवढी होती. त्यामुळे सरकारची धास्ती वाढली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कोविद संदर्भात अधिक माहिती देताना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली होती.
सर्व रुग्णालयांमध्ये कोविड विशेष वॉर्ड सुरु करण्यात येत आहेत. मुंबईतील सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. सेव्हन हिल्स मध्ये 30 कोविड रुग्णांपैकी 5 जण आयसीयू विभागात दाखल आहेत अशी माहिती डॉ. महारुद्र कुंभार यांनी दिली. तर, जे जे रुग्णालय समुहाच्या डॉ. पल्लवी सापळे यांनी औषधे आणि आवश्यक ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.
लिलावती हॉस्पीटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आयसीयूमध्ये 15 बेड्स आणि बॉम्बे हॉस्पीटलमध्ये 10 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कोविड प्रोटोकॉल पाळण्याच्या सुचना रुग्णालयातील कर्मचाऱयांना देण्यात आल्या असून सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार तयारी करत असतानाच आता राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.