मोठी बातमी! प्राजक्ता माळींच्या पत्रकार परिषदेपूर्वी सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य, प्रकरण तापणार?

| Updated on: Dec 28, 2024 | 5:20 PM

आज प्राजक्ता माळी या पत्रकार परिषद घेणार आहेत, मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी आमदार सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मोठी बातमी! प्राजक्ता माळींच्या पत्रकार परिषदेपूर्वी सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य, प्रकरण तापणार?
Follow us on

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आता 19 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. यावरून बीडचं वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना आतापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. सुरेश धस हे या प्रकरणावर बोलताना सातत्यानं आकाचा उल्लेख करतात, मात्र आका कोण याबाबत अद्याप धस यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

मात्र सुरेश धस यांचा बोलण्याचा रोख हा सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे राहिला आहे. या प्रकरणात बोलताना त्यांनी काही अभिनेत्रींची नावं देखील घेतली. यामध्ये सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी यांचा समावेश आहे. यावरून आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. प्राजक्ता माळी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्या या प्रकरणावर आज पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. यावर आता सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले धस? 

मी प्राजक्ता ताईंबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे त्या ज्या तक्रार करतील त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. मी पुन्हा एकदा माझ्या वक्तव्याचं समर्थन करतो, की मी काहीच चुकीचं बोललो नाही. संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी प्राजक्ता माळी यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली जात आहे, त्यांना कोण पत्रकार परिषद घ्यायला लावत आहे हे मला माहीत आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद 

दरम्यान सुरेश धस यांनी बोलताना काही अभिनेत्रींचा उल्लेख केला, त्यामध्ये  सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी यांचा उल्लेख आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणावर आपली भूमिका मांडण्यासाठी आता प्राजक्ता माळी या पत्रकार परिषद घेणार आहेत, प्राजक्ता माळी नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.