विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला रंगत आली असून, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी देशाचे प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती काम करत आहे. मोदींविरोधात खूप राळ उठवण्यात आली, मात्र पुन्हा ते पंतप्रधान झाले, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती काम करत आहे. मोदींविरोधात खूप राळ उठवली, मात्र पुन्हा ते पंतप्रधान झाले. जगभरात त्यांचा नावलौकिक होत आहे.युद्ध थांबवायला मदत करा, अशी देखील त्यांना विनंती करण्यात येते. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची झाली आहे. सबका साथ सबका विकास अशी घोषणा त्यांनी केली. देशातील गरजूंना अन्नधान्य पुरवठा केला जात आहे. २०२९ पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. लोकांसाठी जनआवास योजना, जलजीवन मिशन अशा योजना दिल्या. ओबीसींना घरं दिली, आदिवासींसाठी योजना पारधींसाठी आवास योजना आहेत. मागच्या कॅबिनेटमध्ये ठरलंय आपण सरसकट अडीच लाखांपर्यंत मदत करणार आहोत. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पोहोचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. नळाला पाणी मिळणार आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अनेकांनी सांगितलं पैसे येणार नाही, मात्र मिळाले की नाही लाडक्या बहिणींना पैसे असा सवाल यावेळी भुजबळांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, दीड हजारांचे आता २१०० देणार आहोत. पुढेही ते वाढत जातील. रस्त्याचा विकास झाला आहे, समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत पूर्ण होणार आहे. नाशिकमध्ये आपण १४-१५ उमेदवार उभे केले आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.