मोठी बातमी ! ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण

| Updated on: Jan 16, 2025 | 1:09 PM

ठाणे शहरातील बारा बंगला परिसरात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकीय निवासस्थान आहे. बंगल्याच्या आवारात 40 ते 50 कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या.

मोठी बातमी ! ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण
Follow us on

ठाणे शहरातील पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. बंगल्याच्या आवारात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या घटनेची दखल घेत जिल्हा पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच हा फैलाव केवळ तेवढ्या एका भागापूरताच मर्यादित असून, त्याचा इतरत्र कुठेही फैलाव झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील बारा बंगला परिसरात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकीय निवासस्थान आहे. बंगल्याच्या आवारात 40 ते 50 कोंबड्या पाळण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून त्यातील काही कोंबड्यांचा अचानक जीव जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या पक्ष्यांना कोणतीतरी बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

अखेर पशुसंवर्धन विभागाने त्या दगावलेल्या कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले. अखेर मंगळवारी रात्री या चाचणीचा अहवाल असता, कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निदान झाले. अखेर खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. हा फैलाव केवळ बारा बंगला परिसरापुरता मर्यादित असल्याचे आणि इतरत्र कुठेही पसरले नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र उच्चभ्रू वस्तीच्या या भागात फक्त 20 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. याचा शहरात किंवा आसपासच्या परिसरात कुठलाही फैलाव झालेला नाही असे जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त, डॉक्टर वल्लभ जोशी यांनी नमूद केलं.