परभणी : मुरंबा गावात बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आता सेलू तालुक्यातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील कुपटा गावातील कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल शुक्रवारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आज भल्या पहाटेपासूनच कुपटा गाव आणि 1 किलोमीटर परिसरातील 22 शेतकऱ्यांच्या कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याचं काम सुरु आहे.(Hundreds of hens die of bird flu in Kupta village in Parbhani district)
कुपटा गावात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. कुपटा गाव आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आलं होतं. आता या गावाच्या 5 किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची खरेदी विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. पशुसंवंर्धन, आरोग्य, महसूल, भूजल, भूमी अभिलेख, कृषी विभागाचे अधिकारी या गावात तैनात करण्यात आले आहेत. पहाटेपासून 468 कोंबड्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याचं काम पूर्ण झालं आहे. तर मोकळ्या सोडलेल्या कोंबड्या पकडताना कुक्कुटपालन व्यावसायिकांची चांगलीच दमछाक होत आहे.
कोंबड्या नष्ट केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिसरात निर्जंतुकीकरणाचं काम करण्यात येत आहे. कुपटा गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वाजूला मोठा खड्डा करुन त्यात कोंबड्या पुरण्यात येत आहेत, अशी माहिती सेलू तालुका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्यानंतर 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहेत, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं.
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहेत. कोंबड्या मारण्यासाठी पाच फुटाचा खड्डा खोदण्यात येणार येईल. त्यात केमिकल्स टाकून कोंबड्या मारण्यात येईल, असं केदार यांनी सांगितलं.
नागपूर, लातूर, अमरावती, परभणी, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील कोंबड्यांचे सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी वर्तवली होती.
संबंधित बातम्या :
Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!
Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…
Hundreds of hens die of bird flu in Kupta village in Parbhani district