नागपूर | 7 मार्च 2024 : राज्याची उपराजधानी नागपूरात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस आली आहे. नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात गेल्या काही दिवसांपासून कोंबड्यांमध्ये तुरळक मृत्यूचे प्रमाण आढळून आले होते. परंतू 2 मार्च रोजी सर्वाधिक कोंबड्याचे मृत्यू झाल्याचे आढळल्यामुळे हे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
राज्यातील नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या कोंबड्यांचे नमूने पुणे आणि भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थान NIHSAD या संशोधन प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच अन्य ठिकाणी देखील दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीअंती नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्ल्युएन्झा ( बर्ड फ्लू ) मुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे या केंद्रातील साडे आठ हजार कोंबड्यांना मारुन त्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राण्यांमधील संक्रमण आणि रोगप्रतिबंध तसेच नियंत्रण अधिनियम 2009 आणि बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटर परिसर हा बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. तर याचबरोबर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या नागपूरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र मधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी कोंबड्यांचे नमुने पाठवण्यात आले. 4 मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममधील 8501 कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. फॉर्ममधील 16 हजार पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली आहेत असे नागपूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडकील यांनी म्हटले आहे.