लातूर : लातूर म्हणले की त्याला जोडून (Shortage of water) पाणी टंचाई हे ठरलेलेच आहे. मात्र, यंदा तर मांजरा धरण तुडू्ंब भरले असतानाही कसला आलाय पाणीप्रश्न असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. पाणी मूबलक आहे पण पुववठ्याचे (Management) नियोजनही तेवढेच महत्वाचे आहे. (Latur City) लातूर शहरातील नागरिकांना 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी येत असल्याने पाण्याचे रंग तरी किती असे म्हणण्याची वेळ लातुरकरांवर आली आहे. तर आता याच पिवळसर पाण्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप करीत भाजपाने आता पाणीप्रश्नाला घेऊन मनपावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही मुद्दे असले तरी लातुरकरांना मात्र, पाणी समस्येलाच सामोरे जावे लागत आहे.
लातूर शहराला उस्मानाबाद आणि बीड जिल्हा सीमेवर असलेल्या मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांना 10 ते 15 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आल्याने तळाशी असलेले पाणी वर आले त्यामुळे पिवळसर पाण्याचा पुरवठा काही दिवस झाल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले होते. एकतर 15 दिवसातून एकदा नळाला पाणी आणि ते ही अशा अवस्थेत त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळेच लातूरकरांना पिवळसर पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत असताना मात्र, मनपाकडून कोणतीच कारवाई होत नाही. विकास कामे तर दूरच पण लातूरकरांचे किमान मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यातही येथील सत्ताधारी अयशस्वी झाल्याचा आरोप आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केला आहे. शिवाय त्वरीत शुध्द पाणीपुरवठा न झाल्यास मनपावर मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
मध्यंतरी लातुरकरांना काही दिवस पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाला होता. त्यानंतर सर्व जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली होती . शिवाय वेळीच दुरुस्ती केल्याने आता लातूरमधील नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा होत आहे. तर दुसरीकडे भाजपेच सर्व आरोप फेटाळत पिवळसर पाण्याची एक समस्या निर्माण झाली होती. त्यावर तोडगा काढला गेला आहे. आता लातूरमधील जनतेला शुध्द पाणी मिळत असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.