मराठा आरक्षणाच प्रश्न पावसाळी अधिवेशनता मोठ्या प्रमाणात गाजत असून याच मुद्यावरून बोलताना भाजपचे आमदार बबनराव लोणीकर सभागृहात आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणाच्या लढाईसाठी काँग्रेसने जे वकील दिले ते अतिरेक्यांच्या जामीन घेण्यात व्यस्त होते असा आरोप करत लोणीकर यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ताकाला जाऊन भांड लपवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे असे देखील लोणीकर म्हणाले.
लोणीकरांची आक्रमक भूमिका
गेल्या चाळीस वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. आत्तापर्यंत राज्यात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातल्या 80 टक्के आत्महत्या या मराठा समाजामध्ये झाल्या. चाळीस वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं. मराठवाड्याला देखील चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं पण तरीही मराठा समाजाला आत्तापर्यंत आरक्षण का मिळालं नाही ? असा सवाल विचारत लोणीकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे की आरक्षणाला विरोध आहे, विरोधकांनी भूमिका जाहीर करावी अशी मागणी लोणीकर यांनी केली.
पांढऱ्या पायाचं आघाडीच सरकार आलं आणि…
मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं. पण त्यानंतर पांढऱ्या पायाचं आघाडीच सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण घालवण्याचे पाप या विरोधकांचं आहे.
आरक्षणाच्या लढाईसाठी काँग्रेसने जे वकील दिले ते अतिरेक्यांचा जामीन घेण्यात व्यस्त होते आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. आणि जाणीवपूर्वक ही केस सरकार हरलं असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी विरोधकांवर केला.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती आणि या बैठकीला विरोधक गैरहजर होते, त्यामुळे बैठकीला विरोधक का येऊ शकले नाही? असा सवाल देखील लोणीकर यांनी विचारला
विरोधकांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी नाहीतर…
विरोधी पक्ष नेते सभागृहात आरक्षणाबाबत वेगळी भूमिका मांडतात आणि मीडिया मध्ये वेगळे बोलतात. ताकाला जाऊन गाडगे लपवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे असा आरोपही लोणीकर यांनी केला. त्यामुळे विरोधकांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा महाराष्ट्रातला मराठा समाज विरोधी पक्षाला माफ करणार नाही, अला इशारा लोणीकर यांनी दिला.