“शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं मोठं योगदान”, भाजप आमदाराचा दावा; म्हणाले “फडणवीसांनी…”

| Updated on: Nov 09, 2024 | 4:44 PM

"मला देवेंद्र फडणवीस यांनी मला भक्कम पाठिंबा दिला होता. सरकार आले, दीड दिवस राहिले. पण यानंतरही मी सोबत राहिलो." असेही भाजप आमदाराने म्हटले.

शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं मोठं योगदान, भाजप आमदाराचा दावा; म्हणाले फडणवीसांनी...
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

BJP MLA Kishor Jorgewar : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभेसाठी फक्त ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता चंद्रपुरात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी महायुतीचे चंद्रपूर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी भाषणादरम्यान मोठा खुलासा केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दलही भाष्य केले.

भाजपचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्याच प्रचारासाठी नुकतंच एक भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी “शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं मोठं योगदान आहे. देवेंद्र फडणवीसांनी यासाठी मोठा त्याग केला”, असे किशोर जोरगेवार म्हणाले.

“फडणवीसांना नेतृत्व करण्याची संधी मिळो”

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या मनात चंद्रपूरविषयी विकासाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळो हीच माझी इच्छा आहे”, असे किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

“शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं योगदान”

“मी 2019 ला निवडून आलो. त्यावेळी मला देवेंद्र फडणवीस यांनी मला भक्कम पाठिंबा दिला होता. सरकार आले, दीड दिवस राहिले. पण यानंतरही मी सोबत राहिलो. देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग करत एकनाथ शिंदे यांना संधी दिली. त्यांनी जनहिताचे काम केले. शिंदे सरकार स्थापन करण्यात माझं योगदान आहे”, असे किशोर जोरगेवार यानी म्हटले.

“अम्मा की पढाई ही नवी शैक्षणिक योजना सुरु करणार”

“लोकसभेत झालेल्या पराभवाचे चिंतन करुन आम्ही पुढे जात आहोत. आता मात्र चित्र बदलणार आहे. आम्ही चंद्रपुरातील सर्व 6 विधानसभा जिंकू याची मला खात्री आहे. चंद्रपुरात महाकाली देवस्थान आणि दिक्षाभूमी विकासकामे सुरू आहे. या ठिकाणी प्रदूषण मोठी समस्या असली तरी त्यासाठी उपाययोजना करणार आहोत. त्यासोबतच आम्ही अम्मा की पढाई ही नवी शैक्षणिक योजना सुरू करणार आहोत”, असेही किशोर जोरगेवार यांनी सांगितले.