सांगली : सांगलीच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) मैदानात उतरले आहेत. चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील हॉटेल आयकॉनमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. महापौरपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौरपदासाठी अनेक इच्छुक असल्यामुळे प्रदेशाध्यक्षांना बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे. (BJP Chandrakant Patil meeting for Sangli Mayor Election Candidate)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत ही बैठक होत आहे. यामध्ये भाजप आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित आहेत.
सांगली महापौरपदासाठी इच्छुक कोण?
सांगलीच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सांगलीचे महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. 22 तारखेला महापौर निवडणूक होत असून सत्ताधारी भाजपकडून महापौर पदासाठी स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गणेश माळी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ज्यास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगलीत येऊन बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो आणि सांगलीचा महापौर होण्याची संधी कुणाला मिळते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
बैठकीला कोणाकोणाची हजेरी?
या बैठकीला भाजप आमदार सुरेश खाडे, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सत्यजित देशमुख, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, सम्राट महाडिक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख, दीपक शिंदे उपस्थित आहेत. या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचाही निर्णय होणार आहे.
संबंधित बातम्या :
तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रं, जनता आता कंटाळलीय; चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका
काँग्रेसच्या त्रिकूटाची धास्ती, विदर्भात भाजपचे मिशन ओबीसी, बावनकुळे मैदानात
(BJP Chandrakant Patil meeting for Sangli Mayor Election Candidate)