भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे. घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा? राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, याची आधी माहिती घ्यावी, असा सल्लाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांना दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून हा सल्ला दिला आहे. यावेळी सीतामाईच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाही चढवला. राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
त्यांना राजकारणात रस
शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत. पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात, त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात.
शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 19, 2024
उबाठाने वारसा सोडला
दरम्यान भाजपने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही ढब्बू पैशाच्या मुद्द्यावरून टीका केली. ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं आहे. शिवकालीन ढब्बू पैशाचं संजय राऊतांना काय मोल कळणार? उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि इटालियन राजाची चाकरी सुरू केली, अशी टीका भाजपने केली आहे.
हे वागणं बरं नव्हं
ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं नाणं आहे. शिवप्रेमींच्या ह्रदयातून ते कधीच कालबाह्य होत नाही. याचा विसर संजय राऊत यांना पडला आहे. उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आहे. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना राऊतांनी थोडा विचार करावा, उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे वागणं बरं नव्हं, असं भाजपने म्हटलं आहे.
लुटीचा हिशोब द्या
नोट बंदीमुळे मुंबईच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांनी कमावलेलं घबाड उघडं पडलं असेल म्हणून राऊत यांना दोन हजार रुपयांची नोट आठवली असेल. राऊतांनी फुकाच्या गप्पा मारण्यापेक्षा पत्राचाळीतील मुंबईकरांच्या केलेल्या लुटीचा एकदा हिशेब द्यावा, असं आव्हानच भाजपने दिलं आहे.