मुंबई | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि राजकीय पक्षांच्या तयारीला जोर आला. अबकी बार 400 पार म्हणत भाजपने तयारी सुरू केली आहे, तर इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र असं असलं तरी भाजपच्या मुंबईतील लोकसभेच्या तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १ वाजता रंगशारदा सभागृहात मुंबई भाजपची महत्वाची बैठक होणार आहे.
दिल्ली असो किंवा मुंबई, भाजपच्या बैठकांचे सत्र हे सुरूच आहे. मुंबईतील लोकसभेच्या तीन जागांचा तिढा जो आहे, तो अद्यापही कायम आहे. त्यावरच तोडगा काढण्यासाठी भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची बैठक आज बोलावण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदार यांना या बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील तीन जागांबाबत अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यासाठी रोज नवनवीन चेहऱ्यांची चर्चा होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
मिशन सहा हे भाजपचे मिशन असून मुंबईतील सहाही जागा भाजपला जिंकून आणायच्या असून, त्यासाठीच गेल्या काही काळापासून बैठकांचे सत्र वारंवार सुरू आहे. आजच्या बैठकीत आता त्या तीन जागांसाठी काय विचार होतो, काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.