लोकसभा निवडणुकांचं मतदान सुरू व्हायला आत अवघे काही दिवस उरले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार असून सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी जागावाटपावरून मविआमध्ये अद्याप धुसूफूस सुरू आहे. राज्यातील काही महत्वाच्या जागांवरून अद्याप त्यांच्यात एकमत झालेलं नाही. प्रत्येक पक्षाला मोक्याच्या जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे मविआमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या उमेदवारांची नावं जाहीर केली. मात्र सांगलीसह आणखी एक दोन जागांवरून अद्याप नाराजी आहे. मविआतील याच वादाचा दाखला देत भाजपच्या वरिष्ठ नेत्याने मविआ नेत्यांना टोला लगावला आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचं काही खरं दिसत नाही ‘ असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे.
त्यांची युती आज तुटेल की उद्या तुटेल अशी परिस्थिती …
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ जळगाव आतील जामनेर येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणातून महाविकास आघाडीवर टीका केली. ‘ही जागा मला, ती जागा मला यावरून महाविकास आघाडीमध्ये नेत्याचे रोज वाद सुरू आहेत, त्यांचे नेते दररोज भांडताहेत. महाविकास आघाडीचं राज्यात काही खरं नाही ‘ अशी टीका महाजन यांनी केली
‘ खरी शिवसेना ही आपल्याकडे आहे, खरी राष्ट्रवादी ही पूर्ण आपल्याकडे आलेली आहे. पाच-सात लोकं कुठे शरद पवार साहेबांच्याकडे तर पाच सात आमदार हे उद्धव ठाकरे साहेबांकडे राहिलेले आहेत. ही जागा मला ती जागा मला यावरून महाविकास आघाडीमध्ये नेत्याचे रोज वाद सुरू आहेत, नेत्यांची रोजच्या रोज भांडणं होत आहेत. त्यांची युती आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे . त्यामुळे या देशांमध्ये राज्यांमध्ये अनुकूल परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाला आहे,’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.