कोल्हापूरः महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या निवडणुकींची कमालीची उत्सुकता लागली होती. सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीवर पडणार असल्याचे सांगितले जात होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनीही ग्रामपंचायत निवडणुकीवर आम्हीच बाजी मारणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज लागलेल्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातही भाजपचेच कमळ फुलले असल्याचे दिसून येत आहे.
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असला तरी आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भाजपने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी मागील निवडणुकीत आमदार राजेश पाटील आणि भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्यामध्ये जोरदार लढत झाली होती. तर आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मात्र शिवाजीराव पाटील गटाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीनही तालुक्यात भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. चंदगड तालुक्यात 40 पैकी 29 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. तर आजरा तालुक्यात 13 पैकी 8 आणि गडहिंग्लज तालुक्यात 27 पैकी 14 ग्रामपंचायतीवर भाजपाच्या सरपंचांची निवड झाली आहे.
तिन्ही तालुक्यात भाजप नेते शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर भाजपने वर्चस्व मिळवले असल्याने भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी ही जमेची बाजू ठरणार की भविष्यात आणखी काही गणितं बदलणार याकडे मात्र आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपने या तिन्हीही तालुक्यात वर्चस्व गाजवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र धक्का बसला आहे.