मुंबई : राज्याचं लक्ष आज दोन महत्त्वाच्या घडामोडींकडे लागलंय. भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना (Shivsena) हा वाद विकोपाला गेलाय. भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे संजय राऊत एकिकडे आक्रमक झाले आहेत. तर सत्तेतील भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांचं रुपांतर आता थेट कारवाईत होतोना दिसत आहे. मुंबई मढ येथील अनधिकृत स्डुडिओ पाडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. किरट सोमय्या आज सकाळीच या ठिकाणी हातात हातोडा घेऊन निघाले आहेत. तर संजय राऊतदेखील अहमदनगरकडे निघाले आहेत.
कोविडच्या काळात स्थानिक आमदार अस्लम शेख आणि मुंबईचे तत्कालीन पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कृपेने मढ येथे समुद्र किनारी अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. २०२१ मध्ये ५० हजार स्क्वेअर फूटचे स्टुडिओ आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती. आज हे स्टुडिओ पाडण्याचं काम आज सकाळपासूनच सुरु झालंय. बीएमसीच्या वतीने ही कारवाई करण्यात येतेय. तर ठाकरे सरकारच्या कृपेने डझनभर अनधिकृत स्टुडिओ मालाडमध्ये उभे राहिले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
तर शिवसेना खासदार संजय राऊत हे आज सकाळीच अहमदनगरच्या दिशेने निघाले आहेत. भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचं मनी लाँडरींग झाल्याच आरोप संजय राऊत यांनी केलाय. प्रकरणी आज संजय राऊत भीमा पाटस कारखान्याला भेट देणार आहेत. राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचं हे अत्यंत घाणेरडं प्रकरण आहे. असा आरोप राऊत यांनी केलाय. तर प्रकरणात राऊत थेट सीबीआय डायरेक्टरला पत्र पाठवणार आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप भ्रष्टाचाराचे हे आरोप-प्रत्यारोप आणखी कोणत्या थराला जातायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
राहुल कुल यांच्याप्रमाणेच मालेगावचे मंत्री दादा भुसे यांच्या गिरणा सहकारी कारखान्यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी गोळा केलेले लाखो रुपयेदेखील खिशात घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. या सगळ्याचे पुरावे संजय राऊत यांनी आधीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहेत. मात्र त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप राऊतांनी केलाय.