मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या राजकीय दृष्टया चांगलेच अडचणीत आले आहेत. आरोपांची राळ उडवून देण्यासाठी किरीट सोमय्या ओखळले जातात. भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांवर आतापर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. ईडी, सीबीआयकडे त्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अनेक नेते राजकीय दृष्टया अडचणीत आले. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारा विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे.
तेच किरीट सोमय्या आता अडचणीत सापडले आहेत. त्यांचा एक कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटीझन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.
कथित अश्लील व्हिडिओवर किरीट सोमय्या काय म्हणाले?
किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. सध्या याच व्हिडिओची चर्चा आहे. या कथित अश्लील व्हिडिओवर आता किरीट सोमय्या यांची बाजू समोर आली आहे. किरिट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. “मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जातायेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “किरीट सोमय्या यांच्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आपण हा विषय योग्य व्यासपीठावर मांडणार आहोत. माझ्यासाठी तक्रार करणाऱ्या महिलांची सुरक्षा महत्वाची आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे ठाकरे गटाचे आमदार आहेत.