मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत संपन्न होत आहे. आज आणि उद्या (31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर) अशी दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीला 28 पक्षांचे नेते मुंबईत येत आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र भाजपातर्फे या बैठकीवर कडाडून टीका करण्यात आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.
मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे अशी टीका त्यांनी केली आहे. ज्या लोकांनी काल परवापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला. तसेच ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वाजत गाजत, जोरदार स्वागत करत आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
जनाची नाही तर मनाची तरी लाज…
एवढेच नव्हे तर ज्यांनी महाराष्ट्राचा द्वेष केला त्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांचे तोंड गोड केले जात आहे. पंगती बसू देत आणि जेवणावळीही उठू देत, फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना, या महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे! असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांचं ट्विट जसच्या तसं…
मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे.
◆ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला…
◆ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 31, 2023
मनसेनेही केली टीका
दरम्यान यापूर्वी इंडिया आघाडीच्या या बैठकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही टीका करण्यात आली आहे. मनसे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाज वाटत नाही का ?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
इंडिय आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांसाठी खास जेवणाची सोय करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचं आयोजन केलं आहे.नेत्यांना खास मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेतर्फे टीका करण्यात आली.