बेईमान, शकुनी मामा… ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांच्यावर बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली

| Updated on: Jul 17, 2024 | 4:06 PM

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती आणि या बैठकीला विरोधक गैरहजर होते. त्यामुळे बैठकीला विरोधक का येऊ शकले नाही? असा सवाल करतानाच विरोधी पक्ष नेते सभागृहात आरक्षणाबाबत वेगळी भूमिका मांडतात आणि मीडियामध्ये वेगळे बोलतात. ताकाला जाऊन गाडगे लपवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे विरोधकांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रातला मराठा समाज विरोधी पक्षाला माफ करणार नाही, असं भाजप नेते बबनराव लोणीकर म्हणाले.

बेईमान, शकुनी मामा... ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांच्यावर बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली
Follow us on

भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांवर अत्यंत जहरी टीका केली आहे. ही टीका करताना लोणीकर यांची जीभ घसरली. यावेळी लोणीकर यांनी शरद पवार यांचा बेईमान नेता असा उल्लेख केला. इतकेच नाही तर शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा उल्लेख केला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही लोणीकर यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. त्याचे पडसाद उमटले आहेत.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. मराठा समाजाला फसवणारा सर्वात मोठा बेमान नेता कोण असेल तर शरद पवार आहेत. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. शरद पवार यांच्यासमोर शकुनी मामाही फेल आहे. एका हाताने करायचे आणि एका हाताने फेडायचे, अशी टीका बबनराव लोणीकर यांनी केली.

सिब्बल यांना कोणी आणलं?

आपल्या सरकारने मराठा आरक्षण दिलं. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मराठा आरक्षणाचा फायदा मुलांना शिक्षणात होऊ लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेले. सुप्रीम कोर्टात जेव्हा आरक्षणाची केस होती त्यावेळेस आघाडी सरकारने कपिल सिब्बल वकील दिला. अतिरेक्यांचा जामीन घेणारा, राम मंदिराला विरोध करणारा वकील दिला आणि त्यांनी आरक्षण घालवले. वकील कोणी दिला..? उद्धव ठाकरेंची आणि त्यांची ओळख होती का..? वकील शरद पवार यांनी दिला आणि कपिल सिब्बलमुळे मराठा आरक्षण गेले, असा दावा करतानाच ओबीसींचे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष हे होत होते. परंतु ओबीसींचे आरक्षणही आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे गेले, असा आरोपही बबनराव लोणीकर यांनी केला.

हे साले… बेईमान….

काँग्रेसवाले बेईमान आहेत, राष्ट्रवादीवाले XXXXX आहेत. हे साले शिवसेनावाले बेबनाव करत आहेत. या लोकांच्या बहकाव्यात येऊ नका. हे लोक ओबीसी आणि मराठा भांडण लावत आहेत, असं सांगतानाच मोदीजी सबका साथ, सबका विकास करत आहेत. देशाच्या पंतप्रधानाबद्दल स्वाभिमान बाळगा, असं बबनराव लोणीकर म्हणाले.

आरक्षणाला पाठिंबा की विरोध? जाहीर करा

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून आतापर्यंत राज्यामध्ये 80 टक्के आत्महत्या मराठा समाजामध्ये झाल्या आहेत. राज्यात 40 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होते. मराठवाड्याला देखील चारवेळा मुख्यमंत्रीपद मिळालं. मग मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का? की विरोध आहे? हे जाहीर करावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.